पाणलोट क्षेत्रामध्ये वहितीखालील क्षेत्राचे वरचे बाजूस बिगर शेतीचे क्षेत्र असते. बिगर शेतीचे क्षेत्रामधून वहात येणारे पाणी शेतीचे क्षेत्रात येऊ नये म्हणून आतापर्यन्त डायव्हर्शन ड्रेन काढण्याची पध्दती होती. अशा डायव्हर्शन ड्रेनमुळे ब-याच ठिकाणी झाला असला तरी काही ठिकाणी घळी पडून मातीची धूप होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अशा घळयांची व्याप्तीसुध्दा वाढत जाते. सबब डायव्हर्शन ड्रेनचे काम पूर्णपणे निर्दोष नसल्याचे दिसून येते. म्हणून या कार्यक्रमांतर्गत सध्या डायव्हर्शन ड्रेनची कामे घेवू नयेत. त्याऐवजी त्या जागेवर 3 मीटर रुंदीच्या पट्टयांमध्ये गवताचे ठोंब, झुडुपे, झाडोरा इत्यादी वनस्पतींची दाट जाळी अथवा चाळण तयार करावयाची आहे की जेणे करुन वरील क्षेत्रातील पाणी सदर 3 मीटर रुंदीचे पट्टयामधील वनस्पतीचे जाळीमुळे अडविले जाऊन त्या जागेत मुरविले जाईल आणि वाहत येणारा गाळ सदर जाळीमुळे अडविला जाईल. तसेच वाहणा-या पाण्याच्या वेगावर काही प्रमाणात नियंत्रण येईल. हा तीन मीटरचा पट्टा वरील भागातून शेतात ज्या ठिकाणाहून पाणी येते त्या भागात करावयाचा आहे. सदर 3 मीटरचे पट्टयामध्ये खालीलप्रमाणे कामे करण्यात यावीत.
पावसाळयामध्ये खस गवताचे ठोंब 3 ओळीमध्ये (एक मीटर रुंदीमध्ये) दर 10 सें.मी. वर एक खस स्लीप्स यापध्दतीने लागण करावी. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर काही तासामध्ये खस स्लीप्सची लागवड झाली पाहिजे. अन्यथा खस ठोंब वाहून जाण्याची शक्यता असते. नर्सरीमधून खस ठोंब काढल्यानंतर अशा खस ठोंबाच्या मुळया ओल्या मातीमध्ये दाबून बसवून या सर्व खस ठोबाचे मुळयाकडील भागाभोवती ओले केलेले किलतान गुंडाळून पक्के बांधावे आणि त्याची वाहतूक त्वरेने करुन खस ठोंब उपटल्यापासून जास्तीत जास्त 6 तासांचे आत त्यांची लागवड पूर्ण होईल याची काळजी घ्यावी. या कामात अजिबात हयगय होता कामा नये.
वरील वनस्पतीची लागवड अशा पध्दतीने करावी की, वरुन वाहत येणारे पाणी व माती अडविले जाईल. या संपूर्ण कामास दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कामाची कार्यवाही करताना जमिन मालकांचे सक्रीय सहकार्य आणि सहभाग उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खोदाई, बी पेरणे, लागवड, संरक्षण शक्य असल्यास गरजेनुसार पाणी देणे वगैरे स्वरुपाची कामे जमिन मालकावर सोपवावीत आणि प्रत्येक काम समाधानकारक रितीने पूर्ण झाल्यावर जमीन मालकास त्या कामापोटी पेमेंट अदा करावे. काम चालू असताना त्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करावे.