जलप्रवाहातील वाहते पाणी अडवून ते जमिनीत जिरण्यास वाव करुन द्यावा.यासाठी विकसित केलेले भूमिगत बंधारे व पुनर्भरण चर यांच्या प्रमाणेच खोदतळे हे देखील जल संधारणाचे एक तंत्र आहे. पावसाचे पडणारे पाणी भूपृष्ठीय पाणलोटातून नंतर नदीनाल्यात मिळून वहात असते. प्रवाह तळाच्या उतारामुळे ते वेगाने वाहत जावून शेवटी नैसर्गिक प्रवाहास व नंतर सागरास मिळते. हे वाया जाणारे पाणी जर त्यास अटकाव करुन त्याचा वेग कमी केला व काही काळपर्यन्त ते साठवून ठेवले तर, ते जमिनीत जास्तीत जास्त जिरेल व त्यायोगे भूमीजलाचे पुनर्भरण होईल हा विचार या तंत्रज्ञानामागे आहे. असे हे खोदतळे नालापात्रात तयार केले जाते.
खोद तळयाच्या जागेची निवड करतांना ज्या ठिकाणी नाल्याचे पात्र व प्रवाह सरळ रेषेत आहे, अशी जागा निवडन खोदतळाचे खोदकाम केले जाते. नालापात्रात किती खोलीवर पक्का खडक लागतो त्यानुसार 2 ते 3 मी. खोदतळयाची खोलीवर ठेवण्यात येते. नाला प्रवाहाच्या दिशेने खोद तळयाच्या वर बाजूस कमीत कमी 3:1 व खालच्या बाजूला कमीत कमी 5:1, 4:1 व खालच्या बाजूला 6:1 व 10:1 असा बाजूने उतार ठेवावा. खालच्या बाजूला जास्त उतार वाढल्यामुळे पाण्याबरोबर वाहत येणारी वाळू व रेती, गाळ तळात न साठता प्रवाहाबरोबर वाहून जाईल हा त्यामागील उद्देश आहे. या खोदतळामुळे खालच्या बाजूच्या विहिरीचे पाणी बाजूला वाढण्यास मदत होते.